Thursday 1 May 2014

मातृवात्सल्यविन्दानम् (Post in Marathi)

।। हरि: ॐ ।।

01-05-2014

मातृवात्सल्यविन्दानम्


 आज श्रीपरशुराम जयंती!



 अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः ।
इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।

श्रीगुरुभक्ती कशी करावी याचा आदर्श म्हणजे श्रीपरशुराम! प्राचीन काळापासून गुरुशिष्यपरंपरा हे भारताचे एक बलस्थान राहिले आहे. अशा आदर्श गुरुशिष्यांच्या जोड्यांमध्ये ज्या गुरुशिष्यजोडीचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते, ती जोडी म्हणजे ‘श्रीगुरु दत्तात्रेय आणि त्यांचा शिष्य परशुराम’ ही जोडी. आदिमाता आदिशक्तिच्या स्वरूपाचा बोध श्रीगुरु दत्तात्रेयांनी परशुरामांना केला. ह्या गुरुशिष्य जोडीच्या संवादातून आदिमाता चण्डिकेच्या त्रिविध रूपांच्या चरित्राचे अत्यंत सुस्पष्ट विवेचन करणारा ‘मातृवात्सल्यविन्दानम्’ अर्थात् ‘मातरैश्‍वर्यवेद’ हा सद्गुरु श्रीअनिरुद्धविरचित ग्रन्थ श्रद्धावानांसाठी अत्यंत मार्गदर्शक आहे.

गायत्री, महिषासुरमर्दिनी आणि अनसूया ह्या तिघीही वेगवेगळ्या नसून एकच आहेत. मानवाच्या क्रमबद्ध विकासासाठी एकच असणारी आदिमाता तीन स्तरांवर त्रिविध रूपाने कार्यरत असते. ह्या तिच्या तीनही स्वरूपांना आदिमाता, त्रिधा, दुर्गा, शुद्धविद्या व चण्डिका ह्या नामांनी श्रेष्ठ श्रद्धावानांकडून प्रार्थिले जाते.

अशा या आद्यमातृतत्त्वाच्या म्हणजेच आदिमाता चण्डिकेच्या गायत्री, महिषासुरमर्दिनी आणि अनसूया ह्या त्रिविध स्वरूपांचे एकत्व स्पष्ट करून ह्या तिघींच्याही चरित्राचे अत्यंत सुबोध, नेमके आणि नि:संदिग्ध वर्णन ह्या ग्रन्थात केले गेले आहे.

हा ग्रन्थ केवळ आदिमाताविषयकच नव्हे; तर सर्वच पारमार्थिक संकल्पना अत्यंत सोप्या शब्दांत स्पष्ट करतो. गायत्रीमातेचे पंचमुख स्वरूप व कार्य, विश्‍वाची उत्पत्ती कशी झाली, ब्रह्माण्डांचे कार्य कसे चालते, विश्‍वात पहिला प्रज्ञापराध कोणी व का केला, विश्‍वातील पहिले असुरद्वय कोण, सुरांवर असुर का कुरघोडी करतात, महिषासुर आणि त्याचे चौदा सेनापति यांचे मानवी जीवनातील रूप, महिषासुरमर्दिनीचे नऊ अवतार आणि लीला इथपासून ते अनसूयामातेचे जीवनाख्यान, कलिपुरुषाची आकृती, अनसूयेचे दुर्गारूपात प्रकटन, दत्तात्रेय जन्मकथा, परशुरामाचे जीवनकार्य अशा अनेक मुद्यांचे समर्पक सखोल विवेचन ह्या ग्रन्थात केले आहे.

श्रीअनिरुद्धांना त्यांच्या ह्या आदिमातेच्या वात्सल्यलीलांचे संकीर्तन तर करायचे आहेच, पण त्याचबरोबर श्रद्धावानांचा आदिमातेच्या शुभंकरा व अशुभनाशिनी ह्या दोन यन्त्रणांशी परिचय करून देऊन तिचा विसर हेच अशुभाला आमन्त्रण आणि तिचे स्मरण हेच अशुभाचे उच्चाटन हे सत्यही सांगायचे आहे.
ह्या ग्रन्थाबाबत ते म्हणतात-
‘‘ह्या आख्यानात माझं काहीच नाही परंतु माझं सर्वस्व ह्या आख्यानात गुंतलेलं आहे.
आईचा शब्द ही आज्ञा नसते, तो वज्रलेप असतो. माझ्यासाठी तिच्या शब्दाबाहेर मुळी विश्‍वच नाही.
माझ्या प्रत्येक क्षितिजावर सदैव उदयाला येत असतो, तो दत्तगुरु व त्या प्रत्येक क्षितिजावर सदैव उषा विलसत असते, ती माझ्या प्राणप्रिय आदिमातेची अर्थात परमेश्वरी चण्डिकेची.
कुठल्याही क्षितिजावर फक्त हेच आणि म्हणूनच अस्त व संध्यास्वरूप माझ्यासाठी अस्तित्वातच नाही.
हा ग्रंथही आहे, हे गुणसंकीर्तनही आहे, ही ज्ञानगंगा आहे, ही भक्तिभागीरथीही आहे व आदिमातेचे आख्यान तर आहेच आहे. परंतु ह्या सर्वांच्या पलीकडे हे माझ्या आदिमातेचे शुभंकरा व अशुभनाशिनी स्वरूप आहे, वात्सल्य आहे व वरदानही आहे.
माझ्या लाडक्या श्रद्धावान मित्रांनो, अत्यंत कळकळीने सांगतो आहे की ह्या ग्रंथाचे श्रद्धापूर्वक पठण करणार्‍या श्रद्धावानाच्या समीप ही माझी माय प्रत्यक्ष बसून हा ग्रंथ श्रवण करीत असेल व त्यामुळे तिची छत्रछाया सदैव ग्रंथवाचकावर जेव्हाजेव्हा जरूर असेल, तेव्हा तेव्हा त्याच्याकडे अतिशय प्रखर दुष्प्रारब्ध असले तरीसुद्धा आपोआप धरली जाईल, हा माझा विश्‍वास आहे.’’

सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी या ग्रन्थाद्वारे श्रद्धावानांना त्यांच्या आयुष्यात खूप मोठा आधार दिला आहे, ज्यायोगे श्रद्धावान चण्डिकेची भक्ती करून आपल्या प्रारब्धाशी लढण्यास सुसज्ज होऊ शकतील. 
अंबज्ञोऽस्मि

।। हरि: ॐ ।।