Saturday 26 April 2014

श्रीदेवी-अपराध-क्षमापन स्तोत्रम्‌ (Post in Marathi)

।। हरि: ॐ।।

 26-04-2014

श्रीदेवी-अपराध-क्षमापन स्तोत्रम्‌


श्रीदेवी-अपराध-क्षमापन स्तोत्र हे आदिशंकराचार्यांद्वारे विरचित स्तोत्र आहे आणि मातृवात्सल-उपनिषद्‌ या ग्रन्थात अध्याय क्र. 15 ते 20, 22, 23 आणि 25 ते 28 यांच्या विक्रमांमध्ये दिले गेले आहे. ग्रन्थात हे स्तोत्र उच्चारण आणि अर्थ समजण्यास सोपे जावे म्हणून पदच्छेद करून सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी दिले आहे.




न मन्त्रं न यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो
न च आह्वानं ध्यानं तदपि न च जाने स्तुतिकथा।
न जाने मुद्रा: ते तदपि च न जाने विलपनं
परं जाने मात: त्वद्‌-अनुसरणं क्लेशहरणम्‌।।

हे माते, मला ना मन्त्र समजतो, ना यन्त्र. स्तुति कशी करायची तेदेखील मी जाणत नाही. आवाहन, ध्यान आणि स्तोत्र-कथा यांबाबतही मला काही ठाऊक नाही. ना मी मुद्रांबाबत जाणतो, ना  मला आर्ततेने तुला आळवता येते. परन्तु माते, मला फक्त एवढेच नक्की ठाऊक आहे की तुझे अनुसरण करणे हेच क्लेशहरण करणारे आहे. 

विधे: अज्ञानेन द्रविण-विरहेण आलसतया
विधेय-अशक्यत्वात्‌ तव चरणयो: या च्युति: अभूत्‌।
तदेतत्‌ क्षन्तव्यं जननि सकलोद्धारिणि शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति।।

सर्वांचा उद्धार करणाऱ्या कल्याणकारिणी माते! विधिविधानांचे मला ज्ञान नाही, माझ्याजवळ धनही नाही, माझ्यात आळस भरलेला आहे, मला पूजन-अर्चनही नीटपणे करता येत नाही. या सर्व कारणांमुळे माझ्याकडून तुझ्या सेवेत जे काही न्यून राहिले असेल, त्याबद्दल मला क्षमा कर. कारण एकवेळ जगात कुपुत्र असू शकेल पण कुमाता असणे मात्र कधीच शक्य नाही.

पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरलाः
परं तेषां मध्ये विरल-तरलोऽहं तव सुतः।
मदीय: अयं त्यागः समुचितं इदं नो तव शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति।।

हे माते! या पृथ्वीतलावर तुझे सरळ स्वभावाचे अनेक पुत्र असतील, पण या सर्वांमध्ये मी मात्र तुझा अतिशय अवखळ-चंचल असा विरळा पुत्र आहे. हे कल्याणकारिणी माते! म्हणून तू माझा त्याग करणे योग्य नव्हे; कारण एकवेळ जगात कुपुत्र असू शकेल पण कुमाता असणे मात्र कधीच शक्य नाही.

जगन्‌-मात: मातस्तव चरणसेवा न रचिता
न वा दत्तं देवि द्रविणम्‌ अपि भूयस्‌-तव मया।
तथा अपि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत्‌ प्रकुरुषे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति।।

हे जगन्माते! मी तुझ्या चरणांची सेवा कधीच केली नाही गं! हे देवी! मी तुला कधीही कुठल्याही प्रकारचे धन अर्पण केले नाही. तरीही माझ्यासारख्या अधमावर तू जे निरुपम प्रेम करतेस, याचे कारण हेच आहे की एकवेळ जगात कुपुत्र असू शकेल पण कुमाता असणे मात्र कधीच शक्य नाही.

परित्यक्ता देवा विविध-विध-सेवाकुलतया
मया पञ्चाशीते: अधिकम्‌ अपनीते तु वयसि।
इदानीं चेन्मात: तव यदि कृपा न अपि भविता
निरालम्ब: लम्बोदर-जननि कं यामि शरणम्‌।।

हे माते! इतर देवीदेवतांना नवससायास करण्यात मी माझ्या आयुष्याची पंच्याऐंशी वर्षे घालवली; पण आता मी तसे करणे सोडून दिले आहे त्यामुळे त्यांच्याकडून सहाय्य मिळण्याची आशा मला नाही. हे गणपतिस अवतार घ्यावयास लावणाऱ्या आदिमाते! तू जर माझ्यावर कृपा केली नाहीस, तर निराधार असा मी कोणाला बरं शरण जाऊ?

श्वपाक: जल्पाक: भवति मधुपाकोपम-गिरा
निरातंको रंको विहरति चिरं कोटि-कनकैः।
तव अपर्णे कर्णे विशति मनुवर्णे फलमिदं
जनः को जानीते जननि जपनीयं जपविधौ।।

हे माते अपर्णे! तुझ्या मन्त्राचे एक अक्षर जरी कानावर पडले, तरी त्याचे फल असे मिळते की अधम मूर्खदेखील अत्यन्त मधुर वाणीने बोलणारा धाराप्रवाही वक्ता होतो, दरिद्री मनुष्यसुद्धा कोट्यवधी सुवर्णमुद्रांचा धनी होऊन चिरकाल निर्भय होऊन जगतो. माते! जर तुझ्या मन्त्राच्या एका अक्षराचे श्रवण करण्याचे हे फल असेल तर जे श्रद्धावान प्रेमाने विधिपूर्वक तुझ्या मन्त्राचा जप करण्यात मग्न असतात, त्यांना केवढे अपरंपार फल प्राप्त होत असेल, हे कोण कसं बरं जाणू शकेल? अर्थात्‌ हे अचिन्त्य आहे.

चिताभस्म-आलेप: गरलम्‌-अशनं दिक्पट-धरो
जटाधारी कण्ठे भुजग-पतिहारी पशुपतिः।
कपाली भूतेशो भजति जगदीशैक-पदवीं
भवानि त्वत्‌-पाणिग्रहण-परिपाटी-फलमिदम्‌।।

हे भवानीमाते! जो आपल्या अंगाला चिताभस्म फासून राहतो, जो हालाहलाचे प्राशन करतो, जो दिशारूपी वस्त्र धारण करतो, ज्याच्या मस्तकावर जटा आहेत आणि जो गळ्यात वासुकी नागाचा हार धारण करतो अशा कपाली भूतेश पशुपतिलाही "जगदीश' अर्थात्‌ "महादुर्गेश्वर' ही पदवी प्राप्त व्हावी, याचे कारण काय? आई! त्याने तुझे पाणिग्रहण केले म्हणूनच हे शक्य झाले, तुझ्याशी विवाह केल्याचेच हे त्याला मिळालेले फल आहे.

न मोक्षस्य आकांक्षा भव-विभव-वांछा अपि च न मे
न विज्ञानापेक्षा शशिमुखि सुखेच्छा अपि न पुनः।
अत: त्वां  संयाचे जननि जननं यातु मम वै
मृडानी रुद्राणी शिव शिव भवानी इति जपतः।।

हे चन्द्रासमान सुन्दर वदन असणाऱ्या माते! ना मला मोक्षाची इच्छा आहे, ना मला जगातील वैभवाची लालसा आहे. ना मला विज्ञानाची अपेक्षा आहे, ना मला सुखाची आकांक्षा आहे. आई! मी तुझ्याकडे एवढेच मागणे मागतो की मी भक्तिभावाने, प्रेमाने "मृडानी' "रुद्राणी' "शिव शिव भवानी' असा नामजप करतच जीवनकाल सार्थकी लावावा.

न आराधितासि विधिना विविधोपचारैः
किं रूक्ष-चिन्तन-परै: न कृतं वचोभिः।
श्यामे त्वमेव यदि किञ्चन मयि अनाथे,
धत्से कृपां उचितं अम्ब परं तव एव।।

विविध उपचार अर्पण करून मी तुझी आराधना कधीच केली नाही. रूक्ष चिन्तनातच मग्न असणाऱ्या मी कठोर शब्द बोलणाऱ्या माझ्या वाणीद्वारे सदैव अपराधच केले. हे श्यामल वर्णाच्या माते! तरीही तू जो कृपालेश माझ्यावर करतेस, ते तुझे औदार्य तुलाच शोभून दिसते! तुझ्यासारखी कनवाळू माताच माझ्यासारख्या कुपुत्रालासुद्धा आश्रय देऊ शकते. 

आपत्सु मग्नः स्मरणं त्वदीयं,
करोमि दुर्गे करुणार्णवेशि।
नैतत्‌ शठत्वं मम भावयेथाः
क्षुधातृषार्ता जननीं स्मरन्ति।।

हे माय दुर्गे! करुणार्णवे महादेवी! मी आज माझ्यावर आपत्ति आल्यावर तुझे स्मरण करत आहे, ही माझी लबाडी नाही बरं का आई! कारण भूक आणि तहान यांनी त्रासलेले बाळच मातेची आठवण काढणार!

जगदम्ब विचित्रं अत्र किं परिपूर्णा करुणा अस्ति चेन्मयि।
अपराध-परम्परा-परं न हि माता समुपेक्षते सुतम्‌।।

हे जगन्माते! तुझ्या परिपूर्ण अकारण कारुण्याबाबत मला आश्चर्य मुळीच वाटत नाही; कारण वारंवार अपराध करणाऱ्या मुलाचीही माता कधीच उपेक्षा करत नाही. 

मत्समः पातकी नास्ति पापघ्नी त्वत्समा न हि।
एवं ज्ञात्वा महादेवि यथायोग्यं तथा कुरु।।

हे महादेवी! माझ्यासारखा पापी दुसरा कुणीही नाही आणि तुझ्यासारखी पापहारिणी दुसरी कुणीही नाही, हे जाणून आता जे उचित वाटेल तसे कर.
हरि ॐ.





मूळ संस्कृत स्तोत्र पुढीलप्रमाणे आहे-
 

।। श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम्‌।।


न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो
न चाह्वानं ध्यानं तदपि न च जाने स्तुतिकथा।
न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनं
परं जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणम्‌।।1।।
विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतया
विधेयाशक्यत्वात्तव चरणयोर्या च्युतिरभूत्‌।
तदेतत्‌ क्षन्तव्यं जननि सकलोद्धारिणि शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति।।2।।
पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरलाः
परं तेषां मध्ये विरलतरलोऽहं तव सुतः।
मदीयोऽयं त्यागः समुचितमिदं नो तव शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति।।3।।
जगन्मातर्मातस्तव चरणसेवा न रचिता
न वा दत्तं देवि द्रविणमपि भूयस्तव मया।
तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत्प्रकुरुषे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति।।4।।
परित्यक्ता देवा विविधविधसेवाकुलतया
मया पञ्चाशीतेरधिकमपनीते तु वयसि।
इदानीं चेन्मातस्तव यदि कृपा नापि भविता
निरालम्बो लम्बोदरजननि कं यामि शरणम्‌।।5।।
श्वपाको जल्पाको भवति मधुपाकोपमगिरा
निरातङ्को रङ्को विहरति चिरं कोटिकनकैः।
तवापर्णे कर्णे विशति मनुवर्णे फलमिदं
जनः को जानीते जननि जपनीयं जपविधौ।।6।।
चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरो
जटाधारी कण्ठे भुजगपतिहारी पशुपतिः।
कपाली भूतेशो भजति जगदीशैकपदवीं
भवानि त्वत्पाणिग्रहणपरिपाटीफलमिदम्‌।।7।।
न मोक्षस्याकाङ्‌क्षा भवविभववाञ्छापि च न मे
न विज्ञानापेक्षा शशिमुखि सुखेच्छापि न पुनः।
अतस्त्वां  संयाचे जननि जननं यातु मम वै
नाराधितासि विधिना विविधोपचारैः
किं रूक्षचिन्तनपरैर्न कृतं वचोभिः।
श्यामे त्वमेव यदि किञ्चन मयि अनाथे
धत्से कृपामुचितमम्ब परं तवैव।।9।।
आपत्सु मग्नः स्मरणं त्वदीयं
करोमि दुर्गे करुणार्णवेशि।
नैतच्छठत्वं मम भावयेथाः
क्षुधातृषार्ता जननीं स्मरन्ति।।10।।
जगदम्ब विचित्रमत्र किं परिपूर्णा करुणास्ति चेन्मयि।
अपराधपरम्परापरं न हि माता समुपेक्षते सुतम्‌।।11।।
मत्समः पातकी नास्ति पापघ्नी त्वत्समा न हि।
एवं ज्ञात्वा महादेवि यथा योग्यं तथा कुरु।।12।।

।। एवं श्रीशंकराचार्यविरचितं देव्यपराधक्षमापनस्तोत्रं संपूर्णम्‌।।

हरि: ॐ।