॥ हरि: ॐ ॥
04-07-2017
सुभाषितकुन्दहारावलि: - ०१
माझ्या आजीचे नाव होते - सौ. कुन्दा हरि कर्वे. ती संस्कृतपंडिता होती, संस्कृतवर अत्यंत प्रेम करणारी होती आणि मुख्य म्हणजे संस्कृत शिकवण्याची आवड असणारी होती.ती अत्यंत परिश्रमी, कर्तबगार, कर्मयोगिनी होती. ती सतत संस्कृत श्लोक गुणगुणत असायची. तिचं पाठांतर जबरदस्त होतं, तिची विद्वत्ता आणि स्मरणशक्ती जबरदस्त होती. त्या काळी तिने घर-संसार सांभाळून संस्कृतमध्ये एम.ए. केलं होतं. तिचं अवघं जीवनच संस्कृतमय होतं.
आज ती देहरूपाने या जगात नसली, तरी संस्कृत-ध्यास-अभ्यास-रूपात ती माझ्यासह सदैव आहेच, तिचा आशीर्वाद सदैव माझ्या शिरावर आहेच.
तिची आठवण म्हणून सुभाषितांसंदर्भातील या लेखमालेस ‘सुभाषितकुन्दहारावलि:’ हे नाव दिले आहे. आजी-आजोबा दोघांचेही याद्वारे स्मरण करून त्यांना वन्दन करत आहे.
माझी आजी माझ्याकडून संस्कृत सुभाषिते पाठ करून घेई आणि आम्ही दोघे संस्कृत सुभाषितांच्या भेंड्या खेळत असू. याद्वारे आजीने माझ्यात सुभाषितांबद्दल गोडी उत्पन्न केली. मला आवडलेली सुभाषिते त्यांच्या मराठी, हिन्दी आणि इअंग्रजीतील अर्थासह यथामती देत आहे.
मी संस्कृतचा चाहता असलो, तरी एक विद्यार्थी आहे आणि त्यामुळे या लेखनात माझ्याकडून काही चुका होऊ शकतात, तरी तज्ञांनी याबाबत अवश्य मार्गदर्शन करावे.