Saturday 12 November 2016

आता कैचि अमावास्या। नित्य अनिरुद्ध पौर्णिमा॥ (Post in Marathi)

।। हरि: ॐ ।।

१२-११-२०१६

आता कैचि अमावास्या। नित्य अनिरुद्ध पौर्णिमा॥


प्रत्येक श्रद्धावान भक्त परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्धांना भेटण्यास उत्सुक असतो, आसुसलेला असतो. पण संसारातील विविध जबाबदार्‍यांमुळे त्याला मुंबईस श्रीहरिगुरुग्राम येथे येणे जमतेच असे नाही. तरीदेखील,  गुरुपौर्णिमा आणि अनिरुद्ध पौर्णिमा ह्या दोन दिवशी सद्गुरुक्षेत्री, श्रीहरिगुरुग्रामी येऊन दर्शन घेण्याचे प्रयास श्रद्धावान भक्त करतात.
सद्गुरुतत्त्व सदैव आम्हाला आमचे उचित भरभरून देण्यासाठी सदैव उत्सुक, तत्पर आणि समर्थच असते व आमच्या क्षमतेनुसार देतही असते. आमची क्षमता वाढवण्याचे त्याचे सतत प्रयास असतात.
अकारण कारुण्याने भरलेल्या आणि आमच्यावर निरपेक्ष प्रेम करणार्‍या सद्गुरुतत्त्वाच्या चरणी आम्ही गुरुपौर्णिमा आणि अनिरुद्ध पौर्णिमा अशा पावन पर्वांना जेव्हा वारी करतो, तेव्हा ‘तो’ आमची छोटी झोळी मोठी करतो, झोळीला छिद्रं पडलेली असतील तर ती शिवूनही देतो आणि आमची झोळी पूर्ण भरूनही देतो.
कुणाकडूनही कधीही काहीही न घेणार्‍या आणि कसलीही अपेक्षा न करणार्‍या सद्गुरुतत्त्वाची इच्छा असते की त्याच्या ‘सरकार’चा म्हणजे त्या दत्तगुरुंचा, त्या आदिमाता चण्डिकेचा खजिना त्यांच्या लेकरांनी लुटून न्यावा आणि ह्यासाठी गुरुपौर्णिमा आणि अनिरुद्ध पौर्णिमा ह्या श्रद्धावान भक्तांसाठी दोन पर्वणीच आहेत.
श्रीसाईसच्चरितात आम्ही साईनाथांच्या मुखीचे बोल वाचतो -
उतून चालिला आहे खजिना । एकही कोणी गाडया आणीना ।
खणा म्हणतां कोणीही खणीना । प्रयत्न कोणा करवेना ॥
मी म्हणें तो पैका खणावा । गाडयावारीं लुटून न्यावा ।
खरा माईचा पूत असावा । तेणेंच भरावा भांडार ॥ 
- श्रीसाईसच्चरित ३२ / १६२ व १६३
आमची झोळी भरून देण्यास सद्गुरुतत्त्व समर्थच आहे, आम्हाला फक्त अल्पसा प्रयास करावयाचा आहे, आमचाच भांडार भरण्यासाठी. आम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, गुरुपौर्णिमा आणि अनिरुद्ध पौर्णिमा या पर्वांवर सद्गुरुचरणी वारी करायची आहे. मीनावैनी म्हणतात त्याप्रमाणे अशा श्रद्धावानाच्या जीवनात अमावास्या असूच शकत नाही कारण त्याच्या जीवनात नित्य अनिरुद्ध पौर्णिमाच असते.

ll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll