Thursday 5 June 2014

चण्डिकाकुल (Post in Marathi)

।। हरि: ॐ ।।
०५-०६-२०१४

चण्डिकाकुल




विश्वात अनन्तकोटी ब्रह्माण्डे आणि अनन्तकोटी ब्रह्माण्डांमध्ये असंख्य सजीव-अजीव, चर-अचर, दृश्य-अदृश्य पदार्थ. प्रत्येक माणसाचे स्वत:चे एक जग असते म्हणजेच प्रत्येक माणसातही एक ब्रह्माण्ड असते. माणूस त्याच्या बाहेरील ब्रह्माण्डांना जसा पहात असतो, तसाच त्याच्या आतील ब्रह्माण्डातील घडामोडीही तो अनुभवत असतो.

कसा चालतो या सर्व ब्रह्माण्डांचा कारभार? मी कोण आहे? हे ब्रह्माण्ड कुठून जन्मले? मी कसा आणि का जन्मलो? हे जग सोडून माणूस कुठे जातो? या ब्रह्माण्डांचाही लय होतो का? कशात? कोण आहे कर्ता या सर्व गोष्टींचा?

अगदी आदिम काळापासून माणसाला सतावणारे असे अनेक प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे जो तो आपापल्या परीने शोधत असतो. आम्हां श्रद्धावानांसाठी सद्‌गुरु बापुंनी यासंबंधी सुन्दर सहजसोपे मार्गदर्शन केले आहे. या अनन्तकोटी ब्रह्माण्डांचा कारभार स्वैर अनियन्त्रितपणे चालत नसून या सर्वांवर विश्वनिर्मात्या परमेश्वराचे म्हणजेच दत्तगुरुंचे नियन्त्रण असते. परमेश्वराच्या नियमांनुसारच विश्व चालत असते.

कुणी परमेश्वराला मानो अथवा न मानो, पण त्याचे नियम प्रत्येकावर समानपणे लागू असतातच. परमेश्वर स्वयमेव स्वतन्त्र कर्ता असून तो पूर्ण न्यायी आणि तेवढाच दयाळूही आहे. परमेश्वराला जेव्हा विश्व निर्माण करण्याची इच्छा होते, तेव्हा त्याच्या स्पन्दशक्तिच्या म्हणजेच आदिमाता गायत्री चण्डिकेच्या रूपात तो सक्रिय होतो.



परमेश्वराचेच सक्रिय स्वरूप म्हणजे परमेश्वरी अर्थात्‌आदिमाता चण्डिका.

ही आदिमाता चण्डिकाच तिच्या कुलासह म्हणजेच परिवारासह या विश्वाचा कारभार चालविते. विश्वाच्या केन्द्रस्थानी सुधासिन्धु म्हणजेच अमृताचा सागर आहे. या सुधासिन्धुच्या मधोमध कल्पवृक्षांच्या वाटिकेने व्यापलेले मणिद्वीप आहे. तेथे कदम्बतरुंचे उपवन आहे आणि त्यात चिन्तामणिंद्वारे निर्मिलेल्या महालात आदिमाता चण्डिका तिच्या परिवारासह राहते. या सिद्धान्ताचा रूपकात्मक बोध अधिक महत्त्वाचा आहे आणि सद्‌गुरुच हा बोध करवू शकतात.

आदिमाता चण्डिकेसह तिचा ज्येष्ठ पुत्र श्रीगुरु दत्तात्रेय, त्याचेच प्रतिरूप असणारा हनुमन्त, चण्डिकेचा द्वितीय पुत्र किरातरुद्र, किरातरुद्राची पत्नी शिवगंगागौरी, चण्डिकेचा कनिष्ठ पुत्र देवीसिंह परमात्मा (परमात्म्याची शक्ति आह्लादिनी आणि परमात्म्याचा सहचर आदिशेष यांसह) हे सर्वजण राहतात.

प्रत्येक विश्वघटकाची निर्मिती चण्डिकाकुलातूनच होते, लयही चण्डिकाकुलातच होतो. निर्मिती व लय ह्यांमधील स्थिति व गति घडवून आणणारे, विश्वाला संचालित व अनुशासित करणारेही चण्डिकाकुलच आहे. प्रत्येक विश्वघटक चण्डिकाकुलाच्या अधिकारक्षेत्रातच असतो.

प्रत्येक मानवाची प्रार्थना येऊन पोहोचते, ती या चण्डिकाकुलाकडेच आणि त्या त्या मानवाच्या भक्तीनुसार त्या प्रार्थनेला प्रतिसाद मिळतो, तोदेखील चण्डिकाकुलाकडूनच. चण्डिकाकुल हे विश्वाचे सरकारच आहे.



विश्व-उत्पत्ति-प्रक्रिया समजून घेण्यासाठी फटाक्याचे उदाहरण घेऊया. साधा फटाका लावला तरी आपण काय अनुभवतो?  फटाका फुटतो तेव्हा प्रथम दिसतो "प्रकाश', नंतर फटाक्याच्या ठिकाणी "अग्नि' दिसतो आणि नंतर "ध्वनि' म्हणजे आवाजही ऐकू येतो.

विश्वाच्या उत्पत्तिच्या वेळेस ती स्पंदशक्ति आदिमाता प्रसवते म्हणजेच तिच्यातून तीन तत्त्वे निर्माण करते. आता विचार करा, साध्या फटाक्यामध्ये एवढी उर्जा असते, तर मग त्या आद्य स्पन्दशक्तितून जेव्हा आद्य निर्मिती करणारा प्र-स्पन्द म्हणजेच पहिले प्रचंड विस्फुरण, महाविस्फोट झाला तेव्हा किती समर्थ तत्त्वांचा जन्म झाला असेल!

"मातृवात्सल्यविन्दानम्‌'मध्ये या महाविस्फोटाबद्दल आपण वाचलेच आहे.

ज्याप्रमाणे फटाक्याच्या स्फोटातून प्रकाश, अग्नि आणि ध्वनि या तीन तत्त्वांचा जन्म झाला; त्याप्रमाणे विश्वोत्पत्तिसमयी झालेल्या या महाविस्फोटातून तीन तत्त्वांचा जन्म झाला-

1. शुभ्र व शुभ प्रकाश म्हणजे दिगंबर-दत्तात्रेय,

2. विश्वातील मूळ अग्नितत्त्व म्हणजेच कि रातरुद्र,

3. विश्वातील प्रथम स्पंद, आद्य ध्वनि म्हणजेच प्रणव अर्थात्‌परमात्मा.

आदिमाता गायत्री चण्डिकेने विश्वात सर्वप्रथम या तीन तत्त्वांना जन्म दिला, म्हणून या तिघांना आदिमातेचे तीन पुत्र म्हटले आहे. फटाक्यातील शक्तितून ज्याप्रमाणे प्रकाश, अग्नि व ध्वनि ही तीनच तत्त्वे निर्माण झाली, त्याप्रमाणेच विश्वाच्या आद्य महाविस्फोटातूनही चण्डिकेचे हे तीन पुत्रच निर्माण झाले. हे तिघेही आदिमातेचेच पुत्र असले, तरी तिघांची कार्ये वेगळी आहेत आणि ती त्यांना आदिमातेनेच नेमून दिलेली आहेत.

प्रकाश आणि विकास अन्योन्य आहेत, त्यांना एकमेकांपासून वेगळे काढताच येऊ शकत नाही. प्रकाशच विकास करवणारा आहे. लौकिक दृष्ट्या पाहिले तर साध्या रोपाचा विकासही प्रकाशाशिवाय होऊ शकत नाही आणि विकासशक्तिचा अधिष्ठाता आहे- महाप्राण हनुमन्त. त्यामुळे महाप्राण हनुमन्त हा शुभ्र व शुभ प्रकाश स्वरूप असणाऱ्या दिगंबर-दत्तात्रेयाचेच प्रतिरूप मानला गेला आहे.

अग्नितत्त्वाचे कार्य आहे- सन्तुलन राखणे. बाह्य आणि अन्त:सृष्टीचे सन्तुलन उचित बिन्दुवर सांभाळणे हे किरातरुद्र आणि शिवगंगागौरी यांचे महत्त्वाचे कार्य आहे. पावित्र्याला स्तंभ म्हणजेच आधार देणे, उचिताला प्रेरणा देणे आणि अनुचिताचे स्तंभन करणे हे कार्य श्रद्धावानांसाठी श्रीशिवगंगागौरी सदैव करत असते.

मानवाचे मन हे एक जंगल आहे. अहंकार, षड्‌रिपु आदि अनेक हिंस्र श्वापदे म्हणजेच दुर्वृत्ती त्यात वावरत असतात. त्यांचा सामना करताना मानवाची कुवत तोकडी पडते. दुष्प्रारब्धाशी लढणे तर सामान्य मानवाला अशक्यच वाटते. पण तरीही प्रत्येकाला त्याचे स्वत:चे युद्ध स्वत:च लढायचे असते.

मानव जेव्हा सद्‌गुरुतत्त्वाची (परमात्म्याची) भक्ती करू लागतो, तेव्हा त्याला क्षणिक मोहांवर विजय मिळविण्याचे सामर्थ्य परमात्म्याकडून प्रदान केले जाते. यातूनच या अरण्यात पर्वतशिखरांची निर्मिती होते. त्याचबरोबर परमात्म्याच्या श्रद्धावानांसाठी किरातरुद्र सक्रिय होतो आणि या मनोरूपी जंगलात पर्वतशिखरांच्या अग्रावर राहतो.

हिंस्र श्वापदांची शिकार हा त्याचा छंद आहे आणि श्रद्धावानांना अभय देणे ही त्याची सहज लीला आहे. या जंगलातील सर्व श्वापदांचा म्हणजेच दुर्वृत्तींचा नाश किरातरुद्र करतो आणि श्रद्धावानाचा विकास घडवून आणतो.

प्रत्येक मानवास त्याचा समग्र विकास साधण्यासाठी चिन्तन, शोध आणि अभ्यास यांची गरज असते. या तीनही तत्त्वांचा समतोल साधण्याचे सामर्थ्य श्रद्धावानांना चण्डिकाकुलाकडून सहजपणे प्राप्त होत असते. त्याचबरोबर दुष्प्रारब्धाचा, प्रारब्धभोगांचा विनाशही चण्डिकाकुलच करत असते. या चण्डिकाकुलाचे चरण जिथे आहेत, तोच भर्गलोक, तेच "श्रीगुरुक्षेत्रम्‌'.

तरल स्वरूपात जो भर्गलोक, तोच सूक्ष्म स्वरूपात नामाकाश आणि तोच स्थूल स्वरूपात श्रीगुरुक्षेत्रम्‌. श्रीगुरुक्षेत्रम्‌मध्ये चण्डिकाकुल सदैव सक्रिय आहेच कारण तेच त्यांचे निवासस्थान आहे. श्रीगुरुक्षेत्रम्‌ला शरण असलेल्या श्रद्धावानाला कधीही कुरुक्षेत्रावरील महाभारताचे भोग भोगावे लागत नाहीत. त्यामुळे श्रीगुरुक्षेत्रम्‌ला शरण जाणे हेच आमच्यासाठी श्रेयस्कर आहे.

अशा या चण्डिकाकुलाचा प्रतिनिधि आहे, परमात्मा म्हणजेच देवीसिंह, ज्याला महाविष्णु, परमशिव, प्रजापतिब्रह्मा म्हटले जाते. चण्डिकाकुलाची उपासना कशी करायची याचे मार्गदर्शन करणारा, श्रद्धावानांना क्षमा मिळवून देणारा, आमच्या चुका सुधारण्यास हात देणारा, आम्हाला कधीही दगा न देणारा, आमच्या हितासाठी निरपेक्ष प्रेमाने झटणारा, आमचा खरा मित्र! त्याचा हात डोक्यावर असल्याशिवाय चण्डिकाकुलाची भक्ती करताच येऊ शकत नाही. हा परमात्माच या चण्डिकाकुलाशी आमची नाळ पुन्हा जुळवून देतो.

सद्‌गुरुच आमच्या जीवनात गुरुक्षेत्र निर्माण करतो. सद्‌गुरुच आमच्या जीवनास चण्डिकाकुलाच्या अधिष्ठानाने विकसित करतो. सद्‌गुरुच आमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या अनुचिततेचा, आमच्या दुष्प्रारब्धाचा लय करतो. लाभेवीण प्रेमाने श्रद्धावानाची जबाबदारी स्वशिरी घेऊन अवघाचि संसार आनन्दाचा करणाऱ्या सद्‌गुरुला म्हणूनच पुढील श्लोकाने गुरुगीतेत वन्दिले आहे-

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।

गुरुरेव परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः।।

 

अंबज्ञोऽस्मि ।

  ।। हरि: ॐ ।।