Sunday 4 October 2020

गाणी आणि आठवणी - १६ - या चिमण्यांनो परत फिरा रे .....

 

।। हरि: ॐ ।। 

04-10-2020

गाणी आणि आठवणी -  १६

या चिमण्यांनो परत फिरा रे .....  

२८ सप्टेंबर हा गानकोकिळा लतादीदींचा वाढदिवस आणि १ ऑक्टोबर ही महाकवी ग. दि. माडगूळकर यांची जयंती. दोन महान कलाकारांचे स्मरण आवर्जून करून देणारे असे हे दोन पर्वदिवसच. अशा या साहित्य-संगीतमय पर्वदिनांच्या निमित्ताने माझी आयुर्वेद महाविद्यालयातील सहाध्यायी, मैत्रीण डॉ. सौ. नन्दिता पाटिल हिने आमच्या वर्गमित्रमैत्रिणींच्या सोशल मीडिया ग्रुपवर कालच ‘या चिमण्यांनो, परत फिरा रे’ हे गीत स्वत: गाऊन पोस्ट केलं. १९६८ सालच्या ‘जिव्हाळा’ या चित्रपटातलं हे गीत लिहिलं आहे, ग. दि. माडगूळकर यांनी, या गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी आणि हे गायलं आहे, लता मंगेशकर यांनी.
हे अत्यंत कठीण गीत गाण्याचं जे धाडस नन्दिताने केलं आणि ज्या ताकदीने जीव ओतून गायलं, त्याबद्दल आम्ही सर्वांनीच तिचं कौतुक केलं. या निमित्ताने या अजरामर गीताबद्दल काही लिहावंसं वाटलं. या गीताशी संबंधित एक आठवणही ऐकली होती, तीही स्मरली. मी काही गीत-संगीतातला जाणकार नाही आणि साहित्यिकही नाही. एक सामान्य श्रोता म्हणून हे गाणं ऐकताना जे भाव मनात उमटतात, तेच लिहिले आहेत.