।। हरि: ॐ।।
11- 06- 2017
गाणी आठवणी -०४
ये रे घना ये रे घना
'कवितांजली' कार्यक्रमात सुनीताबाई देशपांडे यांनी या कवितेबद्दल सांगितले
की आरती प्रभुंच्या साहित्यामुळे त्यांना लोकप्रियता, कीर्ती मिळू लागली,
त्यांचे नाव होऊ लागले, तेव्हा या प्रसिद्धीमुळे मनात कदाचित अहंकार
निर्माण झाल्यास माझं मन मलीन होईल, साहित्यावरील लक्ष ढळेल अशी भीती आरती
प्रभूंच्या मनास त्रस्त करू लागली आणि त्यामुळे त्यांनी दयाघन भगवंतासच साद
घातली - ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना. हे दयाघन भगवंता! तू
ये आणि माझ्या मनावर बरस. माता जशी आपल्या तान्हुल्यास न्हाऊ घालते, तसे
माझ्या मनाला न्हाऊ घाल, जेणेकरून त्यावरील अहंमन्यतारूपी मलीनता धुवून
जाईल व त्याचे कोवळेपण, निरागसता, निर्मलता अखंड रहावी.
अधिक माहितीसाठी यूट्यूबची लिंक देत आहे - https://www.youtube.com/watch?v=MhyhmWfNx-A
‘ये
रे घना’ या रचनेसंबंधीच्या अन्य काही आठवणीही प्रचलित आहेत. त्यांतील मला
भावलेली आठवण येथे देत आहे. या आठवणीच्या सत्यासत्यतेबद्दल मला ठाऊक नाही,
पण माझ्यासारख्या सामान्य रसिक श्रोत्यास या आठवणीतून आरती प्रभू आणि शांता
शेळके या दोन महान साहित्यिकांकडून उत्तम गुण शिकता येतील अशी ही आठवण
असल्याचे मला वाटत असल्याने मी मित्रांना याबद्दल सांगत असे आणि
मित्रांकडूनही ‘या आठवणीतून खरंच शिकण्यासारखे आहे’ असा प्रतिसाद मिळत असे
आणि म्हणूनच ही आठवण लिहून ठेवावीशी वाटली म्हणून हा लेखनप्रपंच.
सत्यासत्यता, माहितीचा स्रोत वगैरे गोष्टी ठाऊक नसल्याने यास ऐकीव माहिती
म्हटले तरी हरकत नाही. गुणग्राहकता हा संकलनामागील उद्देश असल्याचे
प्रांजळपणे नमूद करतो.