Tuesday, 24 June 2014

दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम् (Post in Marathi)

।। हरि: ॐ ।।

 

 

२४-०६-२०१४


॥ दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम् ॥



सद्गुरु श्रीअनिरुद्धसिंहविरचित मातृवात्सल्यविन्दानम् या ग्रन्थाच्या ३१व्या अध्यायात दत्तमंगलचण्डिकास्तोत्र आहे. स्वत: श्रीपरशुरामाच्या मुखातून हे स्तोत्र उद्गमित झाले. मातृवात्सल्यविन्दानम्मध्ये आम्ही वाचतो की आदिमाता चण्डिकेच्या आठव्या अवताराचे नाव आहे- दत्तमंगलचण्डिका! सद्गुरु श्रीअनिरुद्धसिंहांनी हेदेखील सांगितले आहे की अष्टादशभुजा  (अठरा हात असणारी) दत्तमंगलचण्डिका ही श्रीगुरुभक्तिरूपा आहे.
येथे दत्तमंगलचण्डिका स्तोत्राचा थोडक्यात अर्थ देत आहे.

श्रीदत्तमंगलचण्डिकास्तोत्राचा संक्षिप्त अर्थ-
"ॐ ह्रीं श्रीं ..... स्वाहा' हा एकवीस अक्षरांचा मन्त्र पूज्य आणि कल्पवृक्षासमान आणि भक्तांच्या सर्व पवित्र कामना पूर्ण करणारा आहे. दहा लाख संख्येएवढा जप करण्याने हा मन्त्र सिद्ध होतो. (सद्‌गुरुकडून प्राप्त झालेला मन्त्र सिद्ध करण्याची गरज नाही. पहिल्या तीन श्लोकांनंतर मोठी आई दत्तमंगलचण्डिकेचे ध्यान वर्णन केले आहे.

जी सोळा वर्षांची (षोडशवर्षीया) आहे,
जिची युवावस्था शाश्वत (सदैव) रूपात सुस्थिर असते (शश्वत्‌-सुस्थिर-यौवना),
जी रूप-गुण इत्यादि सर्व ऐश्वर्यांनी समृद्ध आहे (सर्वरूपगुणाढ्या),
जिची अंगे कोमल आहेत, जी मनाचे हरण करणारी आहे,
श्वेत चाफ्याच्या फुलाप्रमाणे जिची कान्ति आहे (श्वेतचम्पकवर्णाभा),
चन्द्रासमान जिची प्रभा शीतल आहे,
जी अग्निरूपी शुद्ध वस्त्र (रेशमी वस्त्र) परिधान करते (वह्नि-शुद्ध-अंशुक-आधाना) (अंशुक म्हणजे वस्त्र अथवा रेशमी वस्त्र),
जी रत्न-आभूषणांनी विभूषित आहे,
जिने स्वत:च्या डोक्यावर अंबाडा धारण केला आहे (बिभ्रतीं कबरीभारं ) (कबरी म्हणजे अंबाडा),
जिने चमेलीचा हार गळ्यात किंवा गजरा अंबाड्यात घातला आहे (मल्लिकामाल्यभूषित) (मल्लिका म्हणजे चमेली) (माल्य म्हणजे हार किंवा गजरा),
जिचे ओठ बिम्बफळाप्रमाणे लाल रंगाचे आहेत (विम्बोष्ठीं),
जिच्या दंतपंक्ति खूपच सुन्दर आहेत (सुदतीं),
जी शुद्ध आहे,
शरद्‌-पौर्णिमेस विकसित होणा-या कमळाप्रमाणे जिचे मुख आहे (शरद्‌-पद्मनिभ- आनना),
जी स्मित करत आहे,
जिचे वदन प्रसन्न आहे (ईषद्‌-हास्य-प्रसन्न-आस्या),
नीलकमळाप्रमाणे जिचे डोळे आहेत (सुनील-उत्पल-लोचना) (उत्पल म्हणजे कमळ),
जी विश्वाचे धारण-पोषण करते (जगद्‌-धात्रीं),
जी सर्वांना सर्व प्रकारची सम्पदा देते,
जी सोळा कला धारण करते,
जी वज्रपीठ-मण्डपाची ध्वजा आहे,
या घोर संसार-सागरापलीकडे तारून नेणारी जी नौकास्वरूपा आहे (पोतरूपा) (पोत म्हणजे नौका)
अशा त्या सर्वश्रेष्ठ आदिमाता देवी दत्तमंगलचण्डिकेची मी भक्ती करतो.
(या स्तोत्राचा पाठ करताना दत्तमंगलचण्डिका माउलीचे अशा प्रकारे ध्यान करावे.)

दहाव्या श्लोकापासून, संकटांच्या राशिंना नष्ट करणारी, हर्ष-मंगल करणारी, शुभ-मंगल करण्यात दक्ष असणारी अशी जी दत्तमंगलचण्डिका आहे, तिची रक्षण करण्याबाबत प्रार्थना केली आहे. दत्तमंगलचण्डिका सर्वमंगलदायिनी आहे, मंगलांचे मंगल आहे, मंगळवारी तिची पूजा केली जाते, ती प्रपंच आणि परमार्थ मंगलमय बनवते असे तिचे वर्णन पुढे केले आहे. अन्तिम श्लोकात फलश्रुति सांगितली आहे- दत्तमंगलचण्डिकेच्या या मंगल स्तोत्राचे नुसते श्रवण करणा-याचेही सदैव मंगलच होते, त्याचे अमंगल होऊ शकत नाही. (मग जो प्रेमाने याचा पाठ करतो, त्याचे निश्चितच मंगल होणार, त्याचे अमंगल होऊच शकत नाही हे सत्य आहे.)

या स्तोत्राचे १०८ वेळा पठण करणार्‍या श्रद्धावानापासून कलिपुरुष चार हात दूरच राहील, असा साक्षात श्रीगुरुदत्तात्रेयांचा आशीर्वाद आहे.

मातृवात्सल्यविन्दानम्‌ म्हणजेच मातरैश्वर्यवेद यातील हे पवित्र स्तोत्र श्रद्धावानांनी सद्‌गुरुभक्ति दृढ होण्यासाठी अवश्य वाचावे. आदिमाता चण्डिका (मोठी आई) आणि सद्‌गुरुतत्त्व यांच्या कृपेने प्रपंच आणि परमार्थ एकाच वेळेस नक्कीच मंगलमय बनेल.

For more Details, Please refer-
http://ambajnosmi.blogspot.in/2014/06/post-in-hindi_19.html


अंबज्ञोऽस्मि ।

 ।। हरि: ॐ ।।