Sunday, 19 July 2020

घायाळांच्या मनोमिलनी इन्द्रधनु झळकते (Marathi)

।। हरि: ॐ ।। 

19-07-2020

घायाळांच्या मनोमिलनी इन्द्रधनु झळकते 

माझा मित्र चेतन महाजन उत्तमोत्तम निसर्गदृश्य कॅमेर्‍याने क्लिक करत असतो. त्याने काढलेली निसर्ग-छायाचित्रे इतकी बोलकी असतात की ती निसर्गदृश्ये पाहता पाहता आपसूकपणे ओळी सुचत जातात. जानेवारीमध्ये त्याने शेअर केलेल्या,  सूर्यास्तसमयीच्या एका उतरत्या वाटेच्या फोटोवरून मला सहज काही ओळी सुचल्या आणि ८ जानेवारी २०२० रोजी त्या छायाचित्रासह त्या ओळी मी पोस्ट केल्या होत्या - सूर्य उतरता वाट उतरती.........
https://ambajnosmi.blogspot.com/2020/01/marathi.html
खूप दिवसांपूर्वी चेतनने एक सुन्दर निसर्गदृश्य आपल्या कॅमेर्‍यात टिपून शेअर केले होते. त्या दृश्यात पर्वताजवळ एक सरोवर होते. आकाशात ईश्वराने जणू ढगांची माळ बांधली होती आणि त्या माळेतला एक ढग अलगद खाली उतरून सरोवरावर आला होता.
पर्वतशिखरावरील बर्फ, सरोवरातील जल आणि मेघ अशा तीनही रूपांमध्ये जल सुन्दर सजले होते. तो ढग खाली आल्यामुळे मेघमालिकेत झालेल्या मोकळ्या जागेमधून सूर्य जणू हळूच डोकावून पहात होता आणि इन्द्रधनुष्याची एक सुन्दर कमान आकाश आणि धरणीला जोडत होती.
त्या छायाचित्रास पाहताच ज्या ओळी सुचल्या, त्या लिहून ठेवल्या होत्या, पण नंतर त्या ओळी लिहिलेला कागद कुठेतरी ठेवला गेला आणि माझ्या मित्राने काढलेला फोटो मी कुठे सेव्ह केला तेही मला आठवेना. बराच काळ लोटल्यामुळे  मित्रालाही मी केलेल्या वर्णनावरून तो फोटो शोधण्यास वेळ लागणार. त्याला शोधून पाठवायला सांगितला आहे, तो मिळाला की इथे अवश्य पोस्ट करेन, तोपर्यंत आई जगदंबेच्या कृपेने सुचलेल्या ओळी येथे शेअर करत आहे.