Monday, 14 September 2020

संधिकाळ (Marathi)

 ।। हरि: ॐ ।। 

14-09-2020

संधिकाळ 

माझा बालमित्र पूर्वेश शेलटकर याने सप्टेंबर २०२०च्या एका संध्याकाळचा हा अत्यंत सुन्दर असा फोटो शेअर केला. हा फोटो पाहिल्यावर मला काही ओळी सुचल्या.
शहरातल्या एका पर्वतशिखरावर ती आणि तो यांची एका संध्याकाळी भेट होते. ही त्या प्रेमिकांची अखेरची भेट असते. घरून त्यांच्या लग्नाला विरोध असल्याने ते दोघेही आज, ‘पुन्हा कधीच भेटता येणार नाही’, हे एकमेकांना सांगून एकमेकांचा निरोप घेण्यासाठी भेटत आहेत.
जर त्याच्याशी नाही तर कुणाशीच नाही हा तिचा निश्चय आणि जर तिच्याशी नाही तर कुणाशीच नाही हा त्याचा निश्चय. जर असं करायचं असेल तर तुम्ही एकमेकांना कधीच भेटायचं नाही हा घरच्यांचा निर्णय.
दोघेही एकाच क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांचा जीवनप्रवास समांतर रेषांप्रमाणे होणार आहे कारण एकमेकांच्या ऑफिसमध्ये जाणे, मीटिंग्समध्ये किंवा कॉन्फरन्सेसमध्ये एकमेकांसमोर येणे हे घडणार आहे, आसपासच्या मंडळींकडून एकमेकाच्या वाटचालीबद्दल कळणार आहे. अशा प्रकारे एकमेकांसमोर असूनही ते कधीच भेटणार नाहीत, जवळ असूनही समांतर रेषा एकमेकीला कधीच भेटत नाहीत, तसंच यांचंही होणार आहे.
त्यांच्या या निरोपाच्या घडीला त्यांच्या काळजातली वेदना निसर्गात उमटली आहे. पण सर्वकाही प्रतिकूल दिसत असूनसुद्धा वर स्वर्गात लग्नाच्या गाठी मारणारा तो निळा-सावळा प्रेमळ देव या दोघांचे प्रेम पाहून, त्यागाची तयारी पाहून यांच्या समांतर रेषांचे प्रारब्ध मिटवून त्यांच्या हस्तरेखा एकमेकांशी जुळवतो आहे. अर्थात् यांच्या प्रेमाची शोकान्तिका न होता सुखान्तिका होणार आहे.
त्या दोघांना वाटत आहे की ही विरहाची कातर संध्याकाळ आहे, पण त्यांच्या प्रेमामुळे विधात्याने त्यांचा ‘संधि’ म्हणजेच मिलन घडवून आणण्याचे ठरवून त्यांच्यासाठी हा संधिकाळ केला आहे.